१ लाखांचा घातला गंडा
marathinews24.com
पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने प्रभात रस्ता भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण प्रभात रस्त्यावरील सोसायटीत राहायला आहे.
कोथरूडमध्ये घरफोडी, ८ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. एमएनजीएलचे देयक थकले असून, देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चाेरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकाव एपीके फाईल पाठविली. तरुणाने ही फाईल उघडताच मोबाइलमधील गोपनीय माहिती चोरट्यांनी चोरली. तरुणाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्यातून एक लाख एक हजार रुपयांची रुपयांची रोकड लांबविली. रोकड लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर तपास करत आहेत.महावितरण, एमएनजीएलचे देयक थकीत असल्याची बतावणी करुन चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



















