तिघे अल्पवयीन हल्लेखोर ताब्यात, शस्त्रही जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बाजाीराव रस्त्यावर मंगळवारी (दि. ४ ) भरदुपारी दुचाकीस्वार टोळक्याने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करीत खून केला होता. याप्रकरणी तिघा अल्पवयीन हल्लेखोरांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून शस्त्रही जप्त केले. संबंधितांना बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. प्राथमिक तपासानुसार जुलै २०२५ मध्ये झालेल्या भांडणाच्या रागासह पुर्ववैमनस्यातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चाेरले – सविस्तर बातमी
कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर वार करून त्याचा खून केला. भांडणात मध्यस्थी करणार्यावरही वार करून गंभीररित्या जखमी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान, हा हल्ला पुर्ववैमनस्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रागातून आरोपींनी अल्पवयीनावर कोयत्याने वार करून संपविले. मयंक सोमदत्त खरारे (वय १७ रा. सानेनगर, आंबीलओढा) असे खून केलेल्याचे नाव आहे. अभिजित संतोष इंगळे (वय १६ ,रा. दांडेकर पुल) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले तिन्ही अल्पवयीन आरोपी आणि तक्रारदारासह खून झालेला मयंक खरारे पर्वती परिसरातील रहिवाशी आहेत. जुलै २०२५ मध्ये पर्वती पोलीस ठाण्यातंर्गत दाखल एका गंभीर गुन्ह्यात मयत अल्पवयीन खरारे हा मुख्य आरोपी होता. तर हल्ल्यातील मुख्य अल्पवयीन आरोपी तक्रारदार होता. तेव्हापासून त्यांच्यात वितुष्ठ निर्माण झाले होते. त्याच रागातून मुख्य हल्लेखोर अल्पवयीन आरोपीने इतर दोन साथीदारांना बोलावून घेतले. धारदार शस्त्रांची जमवाजमव केली. त्यानंतर मंगळवारी (दि. ४) भरदुपारी सव्वातीनच्या सुमारास मयंक खरारे याच्यासह मित्राला बाजीरावर रस्त्यावर गाठले. त्याच्यावर वार करून ठार केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.





















