मुंबईत विषारी कॅप्सूल वाटप प्रकरण
marathinews24.com
पुणे – मोहरम मिरवणुकीत मुंबईतील विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी (दि.२८) पुण्यातील विमानतळ परिसरातील आरोपी फैयाज प्रेमजी यांच्या घरी जाऊन चौकशी केली. यावेळी त्याचे आई-वडील आणि भावाची पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडून त्याच्या हालचाली, संपर्क, राहण्याची पद्धत तसेच अलीकडील व्यवहारांबाबत माहिती घेतली.
केतनचा डमी पुतळा दरीत फेकून क्राईम रिक्रिएशन – सविस्तर बातमी
घराची पाहणी करून काही आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली. फैयाज प्रेमजी हा मूळचा विमानतळ परिसरातील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो कुटुंबापासून वेगळा राहत असून मुंबईत वास्तव्यास होता. या काळात त्याचे नेमके कोणाशी संबंध होते, तसेच त्याच्या हालचालींचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी भायखळा परिसरातील मोहरम मिरवणुकीदरम्यान फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले होते. तो हर्बल पेनकिलर असल्याचे सांगून भाविकांना कॅप्सूल वाटत होता. मात्र, त्या कॅप्सूलमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे झिंक फॉस्फेट असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून, ५० किलो झिंक फॉस्फेट पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑनलाइन मागणी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपीचा नेमका उद्देश काय होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुंबई पोलिस आणि एटीएसकडून सुरू आहे.
घराजवळ उंदरांचा सुळसुळाट
आरोपी फय्याज प्रेमजी याच्या पुण्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदीर होते. उंदरांचा नायनाट करण्यासाठी तो नियमितपणे झिंक फॉस्फाईड या विषारी रसायनाचा वापर करत असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.























