हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ओएलएक्स ॲपवर टेबल खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला बनावट क्यूआर कोड व बँक खात्याची माहिती पाठवून ४ लाख ८१ हजार ४३० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक, बँक खातेधारक व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश मारुती डांगमाळी (वय ४१, रा. ग्रीनव्हिले सोसायटी, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
कोंढव्यातील रंगाच्या गोदामात आग लागून एकाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी ही फसवणूक झाली. फिर्यादी उमेश डांगमाळी यांनी ओएलएक्स ॲपवर विक्रीसाठी टेबलची जाहिरात दिली होती. ती पाहून आरोपीने टेबल खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलवर विविध बँकांचे क्यूआर कोड पाठवून बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहारांद्वारे ४ लाख ८१ हजार ४३० रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.
‘ड्रॉप शिपिंग’च्या बहाण्याने २१ लाखांचा ऑनलाइन गंडा
फेसबुकवर मैत्री करून व्हॉट्सअपद्वारे संपर्क वाढवत ‘ड्रॉप शिपिंग’ व्यवसायात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २१ लाख ७० हजार ७५८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार चंदननगर परिसरात घडला. याप्रकरणी अज्ञात फेसबुक आयडीधारक, व्हॉट्सअप लिंक वापरणारे तसेच संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजय लक्ष्मीनारायण बुंदेले (वय ४५, रा. भक्तमार रेसिडेन्सी, वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली. आरोपीने फिर्यादी अजय बुंदेले यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्सअपवर सातत्याने संपर्क ठेवत ‘ड्रॉप शिपिंग’ व्यवसायाची बनावट वेबसाइटची लिंक पाठवली. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१ लाख ७० हजार ७५८ रुपये ७४ पैसे ऑनलाइन जमा करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा न देता आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करीत आहेत.



















