फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ३१ लाख ३३ हजार रुपयांची वसूली करण्यात आली. या प्रकरणी गुरुदीपसिंग उर्फ राजूजगतसिंग मखीजा (वय ६३, रा. गुरुवार पेठ), तरविंदरसिंग गुरुनामसिंग व्होरा (वय ५८, रा. उंड्री, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका बेकरी व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाह्यवळण मार्गावर मोटार चालकाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बेकरी व्यावसायिक आहेत. त्यांनी व्यवसायासाठी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले. मुद्दल, तसेच व्याजापोटी त्यांनी वेळोवेळी ३१ लाख ३३ हजार रुपये आरोपींना दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. बनावट कागदपत्रे तयार करून धनादेश न वटल्या प्रकरणी न्यायालयात वकिलामार्फत खटला दाखल केला. व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लोणकर तपास करत आहेत.
मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची १० लाखांची फसवणूक
मतदार यादीतील नावात दुरुस्तीची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वानवडी भागातील साळुंखे विहार रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १० ऑगस्ट रोजी संपर्क साधला. निवडणूक आयोगातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. मतदार यादीत नावाची दुरुस्ती करायची आहे, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. सायबर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरट्यांनी घेतली. त्यानंतर चोरट्यांनी बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने दहा लाख रुपये काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात वर्ग करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.





















