दिलीपराव देशमुख यांना ‘जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण’ पुरस्कार प्रदान
marathinews24.com
पुणे – ‘महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे आणि या पंढरीत लातूरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही महाराष्ट्राच्या राजकारणासह सहकारातील आदर्श राम-लक्ष्मणाची जोडी आहे. दिलीपराव देशमुखांचे सहकार क्षेत्रातील काम उत्तुंग असून त्यांच्या गौरवामुळे पुणे आणि लातूरचा ऋणानुबंध अधिक समृद्ध झाला आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
दलित कला व साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे -डॉ सुखदेव थोरात – सविस्तर बातमी
‘जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन’, पुणे यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित भव्य सोहळ्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना प्रतिष्ठेचा ‘जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार २०२६’ केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी आमदार संजय जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. सौरभ अंकलकोटे पाटील, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत पागे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, भाग्यश्री अंकलकोटे पाटील, डॉ. स्वरूप एकलुरे आणि ॲड. मिथुन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. तुळशीहार, जगदगुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिकात्मक पगडी, मानाचे उपरणे, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशात सहकार क्षेत्रात मोठे काम सुरू आहे. देशातील ८० हजार प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांचे (पॅक्स) संगणकीकरण करण्यात आले असून त्यांना उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध करून दिले जात आहेत. ‘बीज से बाजार तक’ योजनेअंतर्गत तीन मल्टिस्टेट सोसायट्या आणि ६९ हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारली जात आहेत. साखर कारखान्यांच्या प्राप्तिकराचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लावला असून, एनसीसीडीसीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. आगामी १० वर्षांत सहकार क्षेत्रासाठी लागणारे २० लाख कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे ध्येय नवीन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.’
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘विलासराव देशमुखांच्या निधनानंतर दिलीपरावांनी लातूर जिल्ह्याला अत्यंत खंबीरपणे दिशा दिली असून, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सक्षम करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील साडेचारशे बँकांमध्ये अग्रस्थानी असून या बँकेने मेकनाइज्ड फार्मिंग आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. दिलीपरावांचे प्रत्येक निर्णय आर्थिक शिस्त आणि सर्वसामान्यांच्या हिताचे असतात.’
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. ‘विलासराव आणि दिलीपराव यांनी समन्वयातून सहकारात शिस्त आणली आणि तरुण पिढीला विधायक दिशा दिली,’ असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना दिलीपराव देशमुख भावुक झाले. ‘ज्या बालगंधर्व रंगमंदिरात अनेक नाटके आणि गाणी पाहिली, त्याच मोठ्या व्यासपीठावर झालेला हा सत्कार मला भारावून टाकणारा आहे. लातूर बँक पुढील ५ वर्षांत १५ हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत बँकेने १०० कोटींचा नफा मिळवला आहे. समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, रोजगार निर्मिती करणे आणि शेतकऱ्यांना योग्य दर देणे हेच सहकाराचे मुख्य ध्येय असले पाहिजे,’ असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी स्वागतपर भाषणात दिलीपराव देशमुखांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनच्या २०१४ सालापासूनच्या सामाजिक आणि गौरव उपक्रमांची माहिती दिली. यंदा लातूरकरांचे दैवत असलेल्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सन्मान करताना अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ अंकलकोटे पाटील यांनी आभार मानले.
विलासराव देशमुख ‘फेव्हरिट’ मुख्यमंत्री
राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून नेत्यांच्या दिलखुलास कबुलीने कार्यक्रमात एकच रंगत आणली. ‘कॉलेजच्या दिवसांपासूनच विलासराव देशमुख हे माझे अत्यंत आवडते मुख्यमंत्री राहिले आहेत आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही ते माझे तितकेच आवडते मुख्यमंत्री आहेत,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्याआधी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘विलासराव देशमुख हे सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री का होते? कारण त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पक्षभेद विसरून नवीन सामाजिक कार्यकर्ते घडवण्याचे आणि त्यांना ताकद देण्याचे मोठे काम केले,’ असे त्यांनी सांगितले.
साखर संपली अन भाव वाढला!
‘सध्या साखरेचा भाव वाढला असला, तरी कारखान्यातील साखर संपली आहे. इथेनॉलचे उत्पादनही पडून आहे. त्यामुळे साखर कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत वर्षाला तब्बल ८ हजार कोटी रुपयांचा महसूल भरणारा साखर उद्योग सध्या अडचणीत सापडला असून, त्याला मदतीचा हात देण्यासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घ्यावा,’ अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.





















