हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गामुळे जाळे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारणार; ४६ किलोमीटरच्या नव्या मार्गांचेही भूमिपूजन
marathinews24.com
पुणे – Pune Metro News : शहराच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रोचे लोकार्पण आणि नवीन मार्गांचे भूमिपूजन हा ऐतिहासिक टप्पा आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मार्गामुळे पुणे मेट्रोचे जाळे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारणार असून, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि लाखो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुणेकरांनी मेट्रोतून ९ लाख ५८ हजार ६०३ प्रवास केले असून, मेट्रो ही आता पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे.
खाजगी संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच ४२ बी झेड क्रमांकाची नवीन मालिका – सविस्तर बातमी
खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली आणि मानिकबाग–नळस्टॉप या सुमारे ४६ किलोमीटरच्या नव्या मार्गांचे भूमिपूजनही होत आहे. यामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांची जोडणी अधिक सक्षम होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन मेट्रो विस्तारासोबतच पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस, इनर व आउटर रिंग रोड, भूमिगत रस्त्यांचे जाळे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात असल्याचे मोहोळ म्हणाले. पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी प्रास्ताविकातून मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी उपस्थित होते.
पुणे मेट्रो मार्गिका-३ ची ठळक वैशिष्ट्ये
Pune Metro News पुणे मेट्रो मार्गिका-३ (पुणेरी मेट्रो) ही माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी २३.२०३ किलोमीटर लांबीची मार्गिका असून या मार्गावर एकूण २३ उन्नत स्थानके आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-डीबीएफओटी) तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी ही ‘पिंक मेट्रो’ असून या मार्गावर ९० महिला चालक मेट्रो चालविणार आहेत. तसेच प्रकल्पाच्या एकूण मनुष्यबळापैकी ५० टक्के कर्मचारी महिला असणार आहेत. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.




















