अहिल्यानगर रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान कारवाई
marathinews24.com
पुणे – मोटारीतून निघालेल्या सराइतांना पोलिसांनी नाकाबंदीत पकडले. सराइतांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात ही कारवाई करण्यात आली. रोहन ऋषीकेश गायकवाड (वय २२, रा. लोणीकंद, अहिल्यानगर रस्ता), अभिषेक भानुदास लंघे (वय २५, रा. शिरुर, जि. पुणे), विशाल उद्धव झोडगे (वय २२, रा. कासारी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २५ जून रोजी लोणीकंद पोलिसांनी पुणे अहिल्यानगर रस्त्यावर नाकाबंदी केली हाेती.
स्वारगेट एसटी स्थानकात दागिने चोरणाऱ्या महिला गजाआड – सविस्तर बातमी
संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी वाघोलीकडून अहिल्यानगरकडे काळ्या काचा असलेली मोटार निघाली होती. पोलिसांना संशय आल्याने मोटार थांबविण्यात आली. मोटारीची तपासणी करण्यात आली. मोटारीतील आरोपी गायकवाड, लंघे, झोडगे यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करुन झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतुसे, तसेच मोटार असा सहा लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक निरीक्षक गजानन कागणे, स्वप्नील जाधव, सागर जगताप, संताेष अंदुरे, दीपक ठाणगे, रितेश काळे, शुभम चिनके, सुधीर शिवले, मल्हारी सुपरे यांनी ही कारवाई केली.
























