डीजे वादनाच्या पार्श्वभूमीवर बदलाचे वारे
marathinews24.com
पुणे – शहरात विविध उत्सवादरम्यान डीजे वादनामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रेशर मिड आणि प्लाझ्मा बंदच ठेवणे ही आमची भूमिका आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठक घेतली असून, त्यांनाही बदल हवा आहे. आता बस झाला, गणेशोत्सवासाठी पुणे पॅटर्न तयार करू, सर्वांसमोर नवीन आदर्श ठेउयात. पुणेकर नागरिक नियमांचे पालन करणारे असून, सर्वांना सोबत घेउन उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
कर्नाटकातील कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर ४०० किलोची पंचधातूची मेघडंबरी – सविस्तर बातमी
पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता ट्रस्टच्यावतीने शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयात आयोजित शिष्यवृत्ती वितरण समारंभ आणि आदर्श गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, अपर आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त गौहर हसन, उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त मिलींद मोहिमे, उपायुक्त सागर कवडे, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रशांत अमृतकर, यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विघ्नहर्ता न्यासचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक शिस्त पाळतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी आपण दहीहंडी, गणेशोत्सव कालावधीत डीजे वादनाला दूर ठेउयात, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, डीजे वादनामुळे आरोग्यावरील होणारे परिणाम याचा सर्वांनी विचार करावा लागणार आहे. तसेच अशा प्रकारच्या बदलाला सामोरे जाताना प्रत्येक गणेश भक्तानाही आव्हान आहे. मात्र, सर्वांनी नियमांचे पालन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुणे पोलीस दल त्यासाठी आग्रही असेल, सगळ्यांना सोबत घेउन यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा करूया, असेही त्यांनी सांगितले.
बेशिस्तांविरुद्ध कारवाई करणारच, उपकरणे जप्त होतील
गणेशोत्सवात नियमांचे पालन करणार्या मंडळांचे पोलिसांकडून स्वागत केले जाणार आहे. मात्र, निमयभंग करणार्या बेशिस्तांविरुद्ध कारवाईची भूमिका आहे. प्लाझ्मा आणि प्रेशन मीडला आमचा विरोधी असून, त्या उपकरणाद्वारे वादन झाल्यास, संबंधितांविरुद्ध कारवाईसह उपकरण जप्ती होणार आहे. यंदा ईद वेळी मिरवणुकीत बहुतांश लोकांनी ध्वनी नियमांचे पालन केले. मात्र, काही लोकांनी नियम पाळले नाही. त्यांची डीजे उपकरणे जप्त केली. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे. गणेशोत्सवात चांगल्या वातावरणाद्वारे पुणे पॅटर्न तयार करूया. पोलीस दल नियमाच्या अधीन राहून काम करेल असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.





















