विश्रामबाग पोलिसांकडून ५० वर्षीय महिला अटकेत
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या महिलेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. लक्ष्मी प्रकाश सारवान (वय ५०, रा. प्रतिभाताई पवार शाळेजवळ, कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रिक्षाचालकाने ज्येष्ठाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बिबवेवाडी भागात राहायला आहेत. त्या रविवारी (२३ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. गर्दीतून त्या वाट काढत निघाल्या होत्या. त्या वेळी सारवान हिने तक्रारदार ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी सारवान हिला पकडले. तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. सारवाने हिला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक कुदळे तपास करत आहेत.
बोहरी आळीत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी
रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून सात हजार ३६० रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला हिंजवडी परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात खरेदी करत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून रोकड चोरली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन सुजाता महादेव जाधव (वय ३६, रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा) हिला ताब्यात घेतले. जाधव हिने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, पोलीस हवालदार मोमीन तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी बाेहरी आळीतील कापडगंज परिसरात एका महिलेच्या पिशवीतून दीड लाखांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली होती.





















