पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास, जंगली महाराज मंदिरासमोर घटना- दुचाकीस्वार चोरटा पसार
Marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती जंगली महाराज मंदिरासमोर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. महिलेचे दागिने हिसकावून दुचाकीस्वार चोरटा पसार झाला. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील उद्योजकाकडे मागितली ५ कोटींची खंडणी, पाकिस्तानातील क्रमांक वरून संपर्क – सविस्तर बातमी
तक्रारदार महिला सहकारनगर भागात राहायला आहेत. श्री जंगली महाराज मंदिरात वार्षिक उत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार महिला भजनी मंडळात आहेत. बुधवारी (९ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास त्या भजन करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या. श्री जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा भरधाव वेगात पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.
काॅप २४’ ही योजना सुरू, तरीही लूटमार
महिलांकडील दागिने चोरी, तसेच पादचाऱ्यांकडील मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावर होणारे लुटमारीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘काॅप २४’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. दिवसा, तसेच रात्री गस्त घालण्यात येत असली तरी, शहरात लुटमारीच्या घटना सुरू आहेत.
तरुणाला धमकावून दुचाकी चोरली
हडपसर भागात तरुणाला धमकावून त्याची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने हडपसर पाोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार २८ वर्षीय तरूण हडपसर भागात राहायला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हडपसर भागातील क्रेझी कॅफेसमोर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्याला धमकाविले. त्याला मारहाण केली. त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.