जेष्ठ महिलेच्या गळ्यातील मोहनमाळ लंपास, वारजे दिगंबरवाडीतील धक्कादायक घटना
Marathinews24.com
पुणे- दुचाकीस्वार चोरटय़ांनी शहरभर धुडगूस घातला असून, पादचारी महिलांसह सकाळच्या वेळेत व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडणाऱया लक्ष्य करीत लुट केली जात आहे. दिवसेंदिवस लुटमारीच्या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रामुख्याने 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या आणि वार्धक्याकडे झुकलेल्या महिलांचे दागिने हिसकाविल्यास त्यांच्याकडून प्रतिकार केला जात नाही. त्यामुळे दुचाकीस्वार चोरटय़ांनी जेष्ठ महिलांचे दागिने चोरण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे.
मोबाइलवर संभाषण करीत रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ हिसकावून नेली. ही घटना 7 एप्रिलला संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास वारजे माळवाडीतील कॅनरा बँकेसमोर घडली आहे. याप्रकरणी 80 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा दुचाकीस्वार चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरटय़ांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परदेशी पर्यटकांना खाऊ घातली तंबाखू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 80 वर्षीय महिला 7 एप्रिलला संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराजवळ फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी त्या रस्त्याने पायी जात असताना नातलगांसोबत मोबाइलवर संभाषण करीत होत्या. दिगंबरवाडीनजीक कॅनेरा बँकेजवळून जात असताना दुचाकीस्वार दोघा चोरटय़ांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्याजवळ येउन गळ्यातील 20 हजारांची मोहनमाळ हिसकावून नेली. तक्रारदार महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.