गुन्हे शाखा युनीट चारची कामगिरी
Marathinews24.com
पुणे – वर्षभरापासून पसार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. मयुर राजू मोरे (वय २६, रा. बकोरी फाटा, राधेश्वरी कॉलनी, वाघोली) असे अटक सराईताचे नाव आहे. तो गोखलेनगर परिसरातील राहणार असून, त्याच्यावर २०१७ पासून हत्या करण्याचा प्रयत्न करणे, हाणामारी, शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे अशा प्रकारचे ५ गंभीर गुन्हे चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोखलेनगर परिसरातील सराईत मयूर मोरे याच्यावर हाणामारी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. आपल्याविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई होणार हे माहिती पडताच मोरे वर्षभरापुर्वी पसार झाला होता. त्याला अटक करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्तांनी त्याला १५ एप्रिल २०२४ रोजी मंजुरी दिली होती.
महासंचालक विवेक श्रीवास्तव यांची पुणे अग्निशमन दलाला भेट – सविस्तर बातमी
गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक खराडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी फरार मयुर मोरे हा वाघोलीतील बकोरी रोड भागात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउन त्याचा शोध सुरू केला. वाघोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक असलेल्या मोकळ्या जागेत मयुर मोरे आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन तपासासाठी चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, प्रविण राजपुत, यास्मिन सय्यद, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम, वैभव रणपिसे, मयुरी नलावडे,रोहिणी पांढरकर यांनी केली.