येरवड्यातील ६७ वर्षीय जेष्ठाला जाळ्यात अडकविले
Marathinews24.com
पुणे – पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल १८ लाख ६३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. सायबर चोरांनी एक मेसेज पाठवून रिव्ह्यूच्या नावाखाली पैसे पाठवण्यास भाग पाडून ज्येष्ठाची फसवणूक केली. याप्रकरणी गणेश कृष्णमूर्ती अय्यर (वय ६७, रा. शास्त्रीनगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वर्षभरापासून प्रसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अय्यर हे शास्त्रीनगरात राहायला असून, त्यांना १२ ते ३० मार्च कालावधीत सायबर चोरट्यांनी मोबाईलवर पार्ट टाईम जॉब संदर्भात मेसेज पाठवला. त्यानंतर एका लिंकद्वारे टास्क चॅनल करायला सांगून सुरूवातीला ११ हजार ८६१ रुपये अय्यर यांच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून सायबर चोरट्यांनी रिव्ह्यूच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्याचे डिटेल्स शेअर करून त्यावर पैसे पाठवण्यास भाग पाडले. अय्यर यांनी १८ लाख ६३ हजार ३१५ रुपये वर्ग करूनही त्यांना पार्टटाईम जॉबचे पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क बंद करून फसवणूक केली. पाठवलेले पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक ठाकर तपास करीत आहेत.