थेट मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल, अल्पवयीन ताब्यात
Marathinews24.com
पुणे – अल्पवयीन मुलाचा अट्टाहास एका १९ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. बापाकडे हट्ट करून अल्पवयीनाने चक्क रिक्षा चालविण्यास ताब्यात घेतली. त्यानंतर दोघेही मित्र स्वारगेट परिसरात जेवायाला आले होते. जेवण केल्यानंतर अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे रिक्षा चालवून रिलिंगला धडक दिल्यामुळे रिक्षातील १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १५ एप्रिलला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ब्रीजवर घडला आहे. याप्रकरणी रिक्षामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
काळेपडळ पोलिसांनी सराईताला ठोकल्या बेड्या – सविस्तर बातमी
रितेश शिवाजी गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा) रस्ता असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी जालिंदर बबन साळुंके वय ३५ रा. कात्रज असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पोलीस अमलदार विठ्ठल चिपाडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर साळुंके हे रिक्षाचालक असून कात्रज परिसरात राहायला आहेत. १५ एप्रिलला रात्रीच्या सुमारास साळुंके यांच्या १६ वर्षीय मुलाने बापाकडून रिक्षाची चावी घेतली. त्यानंतर १९ वर्षीय मित्र रितेश गायकवाड याला रिक्षात बसवून स्वारगेट परिसरात जेवायला आला होता. जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगा रिक्षा चालवित पुन्हा घराकडे जात होता. त्यावेळेस रितेश हा रिक्षातील पाठीमागील सीटवर बसला होता. अल्पवयीनाने कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात बेदरकारपणे रिक्षा चालवून ब्रीजवरील रिलिंगला धडक दिली. त्यामुळे रितेश खाली पडून गंभीररित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी झालेल्या रितेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रितशेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिक्षा चालकाच्या अल्पवयीन मुलाकडे वाहन परवाना नसतानाही त्याने रिक्षा चालविली. तसेच रिक्षा चालक जालिंदर साळुंके यांनी मुलगा अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याच्या ताब्यात रिक्षा दिली. त्यामुळे वडिलांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करीत आहेत.
पोर्शे अल्पवयीन चालकाने दोघांना चिरडले होते
अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्यानंतरही बेदरकारपणे अलिशान पोर्शे वाहन चालवित दोघा अभियंत्याचा जीव घेतल्याची घटना कल्याणीनगरमध्ये घडली होती. याप्रकरणात संबंधित कुटूंबियांनी पोलीस, ससून, बालन्याय हक्क मंडळासह विविध प्रशासकीय यंत्रणांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी संबधित कुटूंबियाविरूद्ध पोलिसांनी ठोस कारवाई करीत जेरबंद केले होते. तब्बल ९ महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी उलटूनही ते कुटूंबिय कारागृहात आहे.
रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलाच्या ताब्यात वाहन दिले होते. त्यानंतर मुलाने बेदरकापणे रिक्षा चालवून ब्रीजवरील रिलिंगला धडक दिली. त्यामुळे रिक्षातील तरूण खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणा, अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी अल्पवयीनाच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. – समीर शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे