रिक्षात विसरलेले २ लाखांचे दागिने, रोकडची पिशवी मिळवून दिली
Marathinews24.com
पुणे – रिक्षाप्रवासात विसलेल्या पिशवीतील तब्बल २ लाखांचे सोन्याचे दागिन आणि तीन हजारांची रोकड जशीच्या तशी तक्रारदाराला मिळवून देण्यात खडकी पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षा चालकाचा क्रमांक शोधल्यानंतर संंबंधिताला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या रिक्षात असलेली दागिन्यांची पिशवी एक तासात माघारी मिळवून दिली आहे. त्यामुळे तक्रारदार कुटूंबियाने खडकी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करीत रिक्षाचालकाला २१०० रूपयांचे बक्षीस दिले आहे.
मराठी भाषेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही; सुप्रिया सुळे – सविस्तर बातमी
तक्रारदार प्राची राजेश चव्हाण आणि अंकिता चव्हाण त्यांच्या आजीसोबत खडकी परिसरात लग्नसमारंभासाठी लागणारे दागीने पॉलिस करून घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर हळदीचा बाजार घेऊन चव्हाण कुटूंबिय रिक्षाने खडकी रेल्वे स्टेशनला पोहचले. त्यावेळी त्यांना दागिन्यांची पिशवी रिक्षात विसरून राहिल्याचे ध्यानात आहे. त्यानुसार प्राची यांनी तातडीने खडकी पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांना घटनेची माहिती दिली. लग्नसमारंभासाठी तक्रारदार महिलेने दुसर्याचे आणलेले दागिने पॉलिस करताना गहाळ झाले. त्यामुळे संबंधित महिला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले यांनी तातडीने तपासाला गती दिली.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तक्रारदारांनी प्रवास केलेल्या एम (एच १२ जे एस ६०१३) या रिक्षाचालक संतोष उर्फ माऊली भिसे (वय ४४ रा. दापोडी) यांचा तासाभरात माग काढला. पोलिसांनी भिसे यांना फोन केला असता, ते घरात जेवण करीत होते. त्यांना रिक्षात पिशवी विसरल्याची काहीही माहिती नव्हती. त्यांना पोलिसांनी संपर्क करुन तातडीने पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षात शोधाशोध केली असता सुदैवाने दागिन्यांसह रोकडची पिशवी मिळून आली. दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस आणि रोकड परत मिळाल्यामुळे चव्हाण कुटूंबियाचे आनंदाश्रू वाहत होते प्रामाणिक रिक्षाचालक संतोष भिसे यांचा पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच तक्रारदार चव्हाण कुटूंबियाने त्यांना २१०० रूपयांचे बक्षीस देत कौतुक केले. यावेळी दिनेश हेमराज सोलंकी, नरेश पुष्पावती, इंद्रसेन जाधव उपस्थित होते.
नाहीतर दागिने विकत घेउन द्यावे लागले असते
तक्रारदार प्राची चव्हाण यांच्याकडून गहाळ झालेले दागिने नातेवाईकांना पुन्हा विकत घेउन देणे शक्य नव्हते. त्याशिवाय नातेवाईकांना प्राचीबद्दल गैरसमज होऊन त्यांच्यावर चोरीचा आळ येण्यासह पोलीस ठाण्यात तक्रार होण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी वेळीच केलेल्या सहकार्याने चव्हाण कुटूंबियाला मोठ्या संकटापासून आणि बदनामीपासून वाचविल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या ४ तासापूर्वी रिक्षात विसरलेली बॅग शोधून काढल्याने त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
कोट- रिक्षातून प्रवास करताना तक्रारदार महिलेचे दोन लाखांचे दागिने आणि रोकडची पिशवी गाडीत विसरली होती. याप्रकरणी तक्रारदार ठाण्यात आल्यानंतर लगेचच आम्ही सीसीटीव्ही फुटेजसह परिसरातील रिक्षाचालकांकडून माहिती गोळा केली. अवघ्या चार तासात संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेउन तक्रारदाराला दागिन्यांची पिशवी मिळवून दिली आहे. – दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक, तपास पथक, खडकी पोलीस ठाणे