शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
marathinews24.com
बारामती – कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित ‘आदर्श अंजीर उत्पादन पद्धती व निर्यात’ या प्रशिक्षण सत्रास दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. धीरज शिंदे, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्ग अवलंबा; उपविभागीय अधिकारी नावडकर – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, जिल्ह्यात ‘दिशा कृषी उन्नतीची- २०२९’ हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल करडई या निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ, निर्यातसाखळी तयार करणे यातून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे. .या कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत प्रथम शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना कृषी विभाग आणि आत्माच्या मदतीने प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावात ‘मास्टर प्रशिक्षक’ म्हणून जबाबदारी देण्यात यावी. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.
निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवून अधिकाधिक पिकांची निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आगामी काळात पिकांचा सामूहिक पद्धतीने विकास करण्याच्यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार येणार आहे, असे डुडी यांनी सांगितले. यावेळी काचोळे यांनी प्रास्ताविक केले.