कोयता, मिरचीपूड, दोरखंड जप्त, आंबेगाव पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात आंबेगाव पोलिसांना यश आले आहे. टोळीकडून कोयता, मिरचीपूड, दोरखंड असा ४० हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक केली असून, दोन अल्पवयीनांनाही ताब्यात घेतले आहे.
रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व दोन काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
सौरभ गोरक्ष चौधरी (वय २३ रा. जय शंकर कॉलनी अंजनी नगर, कात्रज) ओंकार महादेव देवकते (वय २२ रा. लेन नं.७ संतोष नगर, कात्रज ) रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय १८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना २४ एप्रिलला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे-कात्रज रस्त्यावरील गंधर्व लॉन्सनजीक उघडकीस आली. पोलीस अमलदार हनमंत सोपान मासाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पोलिसांचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना टोळके दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्रुाची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गंधर्व लॉन्सनजीक मोकळ्या जागी धाव घेत पाचजणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे कोयता, मिरचीपूड, दोरखंड असा शस्त्रसाठा मिळून आला. मध्यरात्रीच्या सुमारास नजीकच्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार करण्याचा त्यांचा डाव उघडकीस आला आहे. हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, दरोडा टकाण्याची पुर्ण तयारी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी तपास करीत आहेत.