नागरिकांची रोकड लुटणार्या दोघांना अटक
marathinews24.com
पुणे– एटीएम मशीनमध्ये फेरफार करून नागरिकांनी एटीएम कार्डद्वारे गोपनीय क्रमांक समाविष्ट करून काढलेली रक्कम त्यांना न मिळता चोरट्यांनी बसविलेल्या फ्लॅपमध्ये साठत होती. मात्र, रक्कम न मिळाल्यानंतर माघारी परतलेल्या ग्राहकांची मशीनमध्ये साठवलेली रोकड काढून घेत फसवणूक करणार्या दोघांचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. आरोपींनी अनेक ठिकाणी अशाप्रकारचे फ्लॅप बसवून नागरिकांचे पैसे लुटल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
पैसे पडल्याची बतावणी करीत व्यावसायिकाच्या ड्रायव्हरला लुटले – सविस्तर बातमी
संतोषी कुमार किशोलीलाल सरोज (वय ३० रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश) प्रदीपकुमार नंदकिशोर मोर्य (वय २८ रा. कोतवाली, प्रतापगड, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन महाजन वय ५७ रा. कोथरूड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना ३१ मार्च ते २२ एप्रिल कालावधीत वारजेतील जनसेवा सहकारी बँकेच्या एटीएमसेंटरमध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्हीही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील असून, कामाच्या बहाण्याने ते पुण्यात आले होते. मात्र, त्यांनी एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करून लुट करण्याचा डाव रचला. त्यानुसार आरोपींनी वारजेतील जनसेवा सहकारी बँकेच्या एटीएमसेंटरमध्ये फ्लॅप बसविला होता. त्यामुळे ग्राहकाने गोपनीय पीन क्रमांक टाकून पैसे काढल्यानंतर ते पैसे मशीनमधून बाहेर येत नव्हते. संबंधित रक्कम फ्लॅपमध्ये साठविली जात होती. मशीनमध्ये घोटाळा असेली, असा समज करून ग्राहक एटीएममधून बाहेर पडल्यानंतर चोरटे सेंटरमध्ये जात होते. त्यानंतर संबंधित फ्लॅपमध्ये साठलेली रक्कम काढून घेत फसवणूक करीत होते. गुन्हा दाखल होताच वारजे माळवाडी पोलिसांनी एटीएम सेंटरवर वॉच ठेवला होता. त्यानुसार संबंधित दोघांना ताब्यात घेत अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करीत आहेत.
अशी करीत होते फसवणूक
एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये चोरट्यांनी कॅश डिस्पेन्सरच्या खाली काळ्या रंगाचा फ्लॅप बसविला होता. त्याद्वारे मशीनमध्ये छेडछाड केली होती. बँक ग्राहकाने पीन समाविष्ट करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना स्वतःच्या खात्यातून वजा झालेली रक्कम मिळत नव्हती. ती रक्कम थेट फ्लॅटपमध्ये साठविली जात होती. संबंधित रक्कम काढून घेत आरोपी फसवणूक करीत होते. अशाप्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असल्यास, त्यांनी वारजे माळवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.