बारामती येथे बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्रदान
marathinews24.com
बारामती – परिचर्या महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ,बारामती या संस्थेत बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्याकडून प्रथम संलग्नता प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सिमा माने यांनी दिली आहे.
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेनंतर या महाविद्यालयात १०० विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग करिताप्रवेश घेणार आहेत. सदरचे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सक्षमता तपासणी करण्यात आली होती.
सदरचे महाविद्यालय सुरु करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले यांचे मार्गदर्शन लाभले. यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के, उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव , रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांचे सहकार्य लाभले, असेही श्रीमती माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.