युपीएससीत ५५१ व्या क्रमांकाने मिळवले घवघवशीत यश; कागल तालुक्यातील बिरदेव डोणे यांची बाजी
marathinews24.com
कोल्हापूर – आरं पोरा किती अभ्यास करणार बाबा, आपल्या पाचवीला गावगावचे रानमाळंच पुजलं हाय. तवा झेपल एवढाच अभ्यास कर नाहीतर ही मेंढर सांभाळ अन लगीन कर, म्हजी आमी मोकळं झालो बघ. अशी आई-वडिलांची तीव्र साद पोराच्या हदयाला लागली होती. त्यामुळेच त्याने अभ्यासात कधीच कसूर ठेवला नाही. सततचा संघर्ष, अभ्यासाचे सात्यत ठेवत अखेर त्याने बाजी मारलीच. पदवीनंतर युपीएससीचा अभ्यास करीत देशात ५५१वा क्रमांक मिळवत त्याने थेट आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. कागल तालुक्यातील मेंढपाळाच्या पोराने मिळविलेल्या यशाचे जगभरातून कौतुक केले जात आहे.
मोक्कामॅन ते कैद्यांनी अनुभवलेला हळवा अधिकारी; अमिताभ गुप्ता – सविस्तर लेख
बिरदेव डोणे असे यश प्राप्त केलेल्या तरूणाचे नाव असून, युपीएससीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळेस तो मेंढरे चारात होता. अखेर मित्राने त्याला निकालाची बातमी देताच, बिरदेवसह कुटूंबियाच्या डोळ्यातून आनंदआश्रू वाहू लागले. बिरदेवने ५५१ व्या क्रमांकाने परीक्षेत उत्तीर्ण होउन त्याने थेट आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. बिरदेव हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मेंढपाळाचा मुलगा असून, घरची परिस्थिती नाजूक असतानाही त्याने केलेला संघर्ष वाखाण्याजोगा असल्याची प्रतिक्रया अनेकांनी दिली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बिरदेवच्या राहणीमानावरून अनेकांनी त्याची चेष्टा केली होती. मात्र, त्याच पठ्ठयाने युपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादित करीत अनेकांची बोलतीच बंद केली आहे.
परिस्थितीशी समतोल साधून खडतर संघर्ष
शालेय, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर बिरदेवने विद्येच्या माहेरघरात पाउल ठेवले होते. त्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यासाला प्राधान्य देत श्रीगणेशा केला. बिरदेव हा सिव्हिल इंजिनिअर असतानाही त्याने नोकरीच्या मागे न लागता स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. बेभरवशी आणि खडतर मार्गावरून जाण्याचा पत्करलेला त्याचा मार्ग मित्रांसह अनेकांना पटला नाही. मात्र, मनात काहीतरी जिद्द घेउन बिरदेवने अभ्यास सुरूच ठेवला होता. अखेर त्याचा अभ्यासाचा संघर्ष नुकताच संपल्याचे निकालावून दिसून आला आहे. त्याने अवघड अशा युपीएसीतून थेट आयपीएसला गवसणी घातली आहे.
निकालाच्या दिवशी बिरदेव मेंढरं चारत होता
युपीएससी निकालाच्या दिवशी बिरदेव भर उन्हात मेंढरे चारायला घेउन माळावर गेला होता. वडील आजारी असल्याने सध्या मेंढरे घेउन जात असल्याचे सांगितले. वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झाले असल्यामुळे त्याने मेंढरे हाकत कुटूंबियाला मदत केल्याचे सांगितले.
पुण्यात हरवला मोबाइल, पोलीस तक्रारही घेईनात
काही दिवसांपूर्वी बिरदेवचा मोबाईल पुण्यात हरवला. त्याने पोलीस तक्रार द्यावी म्हणून ठाणे गाठले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. त्यामुळे बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणार्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस ठाण्यात जात असल्याचे मित्रांनी सांगितले आहे. आज हाच बिरदेव भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल, अशी आशा मित्रांना आहे.