काळेपडळ गुन्ह्यात दोन महिने होता पसार
marathinews24.com
पुणे – राज्यभरात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी प्रकरणात अटकेतील आरोपीच्या मुख्य पार्टनरला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने ताब्यात घेतले आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. मागील दोन महिन्यांपासून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. अखेर गुरूवारी युनीट दोनने त्याला काळेपडळ परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याला गुन्ह्यासाठी पोलीस ठाण्यात वर्ग केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.
मैत्रिणीला भेटायला आला आणि वांटेड तडीपार जाळ्यात अडकला – सविस्तर बातमी
प्रकाश भाटी (वय ४०) असे ताब्यात घेतलेल्या गुटखा तस्कराचे नाव असून, पुढील तपासासाठी त्याला काळेपडळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात संपत राज, सुरेशकुमार पेमाराम भाटी, भवर भाटी, निजामुद्दीन शेख, गुप्ता (पुर्ण नाव नाही), संदीप ढाका, आशु उर्फ शिवप्रकाश गुप्ता यांच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
प्रतिबंधित गुटखा तस्करीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाकडून कारवाईला गती दिली होती. १७ फेब्रुवारीला संबंधित पथकाला गुटख्याचा साठा असलेल्या गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने उंड्री परिसरातील वडाचीवाडी येथे पंचासमक्ष घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. त्यावेळी गोदामात ११ लाख ५६ हजारांचा गुटखा मिळून आला. तसेच तीन वाहनांत मिळून ६४ लाख ४४ हजारांचा गुटखा पथकाने जप्त केला. संबंधित गुन्ह्यातील आरोपी संपत राज याच्यासह भाटी, शेख, गुप्ता, ढाका यांनी संगणमताने गुटख्याची विक्रीचा डाव रचल्याचे दिसून आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील आरोपी निजामुद्दीन शेख याला नुकतेच राजगडने अटक केली. त्यानंतर खडक, काळेपडळ पोलिसांनी वर्ग करून घेत तपास केला आहे. सध्या तो कारागृहात असून, त्याचा साथीदार प्रकाश भाटी याला युनीट दोनने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोट- काळेपडळ पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात पसार असलेला आरोपी प्रकाश भाटी याला ताब्यात घेतले असून, त्याला संबंधित ठाण्याकडे वर्ग केले जाणार आहे.
प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट दोन