पुणे लोहमार्ग पोलिसांची डिजिटल वाटचाल इ-ऑफिस प्रणालीमुळे कागदांची झंझट संपली
Marathinews24.com
पुणे – प्रशासकीय कामातील गतीमानता वाढविण्यासह पारदर्शकता आणण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानअुषंगाने कर्मचारी-अधिकार्यांकडून आता आधुनिक काळात वाढत्या टेक्नोसॅव्हीचा वापर करण्यावर भर दिला आहे. प्रामुख्याने इ-ऑफीसद्वारे फायलींचा तत्परतेने निपटारा होण्यासाठी शुभारंभ केला आहे. त्यासाठी ११५ कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणतीही फाईल कागदोपत्री न पाठवता डिजीटलस्वरूपात ऑनलाईनरित्या पाठविण्यात सुरूवात झाली आहे. पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इ-ऑफीस प्रणालीची अमंलबजावणी केली जात आहे.
कंपनीला बदनाम करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितली – सविस्तर बातमी
ब्रिटीश राजवटीपासून बहुतांश शासकीय कार्यालयात विविध कागदपत्रांच्या फाईलींचा प्रवास संथगतीने सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर महत्वाच्या फाईंलीसह खात्यातंर्गत कागदपत्रांची वेगाने देवाण-घेवाण होण्यासाठी लोहमार्ग पुणे पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार आता पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मिरज या कार्यालयातून थेट इ-ऑफीस प्रणाली राबविण्यात येत आहे. संबंधित संपुर्ण इ-प्रणालीची माहिती व प्रशिक्षण ११५ कर्मचार्यांना देण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे गलेलठ्ठ फाईलींचे जाळे आता हळूहळू इ-फायलींकडे वळत आहे. या उपक्रमाची सुरूवात करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे आता कार्यालयातंर्गत फायलींचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे.
कनिष्ट कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे केला जाणार पत्रव्यवहार इ-ऑफीस प्रणालीद्वारे करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फाईलींवर सही, शेरा, सूचना वेगाने होत असल्यामुळे कर्मचार्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. इ-ऑफीस प्रणालीमुळे हद्दीतील पोलीस कर्मचार्यांसह, लिपीकांना शेकडो किलोमीटरचा प्रवास टळला आहे. त्यासोबत प्रवास खर्च, भत्ता, इतर आर्थिंक बचतही होण्यास मदत झाली आहे. इ-ऑफीसद्वारे प्राप्त अहवाल, विविध खात्यातंर्गत निर्णयाची अमलबजावणी, सुटी-बदलीसाठी अर्जांच्या फाईली क्षणाधार्त शेरा मारून पुढे पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे टेक्नोसॅव्ही उपक्रमाचा लोहमार्ग पुणे प्रशासनाला चांगला फायदा होत आहे. आगामी काळात सर्वच बाबातीत इ-ऑफीस प्रणालीची अमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
इ-फायलींवर जागेवरच शेरा, क्षणार्धात निर्णय
लोहमार्ग पुणे पोलिसांच्या इ-ऑफीस प्रणालीमुळे कर्मचार्यांसह-अधिकार्यांचीही दगदग थांबली आहे. क्षणाधार्त निर्णय, जागेवरच ऑनलााईनरित्या रिमार्क, कनिष्टांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना आपआपले निर्णय घेउन इ-फाईल सबमीट करण्याचा पर्याय फायदेशीर ठरत आहे. त्यासोबतच कोल्हापूर, सोलापूर, लोणावळा यासारख्या दूरवर असलेल्या हद्दीतील अमलदारांपासून अधिकार्यांच्या सुटीचे निर्णय, विविध अर्जांसंदर्भात शेरा मारून निर्णय घेतला जात आहे.
फाईलींवर सहीच होणार नाही, इ-ऑफीस पर्याय
प्रशासकीय कामकाजासह विविध फाईलींवर वरिष्ठ अधिकार्यांच्या सह्या घेण्यासाठी कारकुनांची लगबग होत होती. मात्र, इ-ऑफीस प्रणालीला सुरूवात झाल्यापासून लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या टेबलावर कागदोपत्री फाईल जाणार नाही, अशी दक्षता घेतली जात आहे. जर कोणी फाईल पाठविली तर संबंधित फाईल इ-ऑफीस प्रणालीद्वारे का पाठविली नाही, याचा जाब विचारला जात आहे.
लोहमार्ग पुणे अखत्यारित असलेल्या कार्यालयात इ-ऑफीस प्रणाली कार्यन्वित झाली आहे. त्याद्वारे आता विविध इ-फाईलींचा निपटारा केला जात आहे. प्रामुख्याने यासाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, इ-फायलींचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. त्यामुळे अमलदारांचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची यशस्वीरित्या अमलबजावणी केली जात आहे. – रोहिदास पवार, अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे