उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
marathinews24.com
पुणे- राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ एप्रिलला सकाळी आठ वाजता भूमिपूजन होणार आहे. कुटुंब कल्याण भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन २० आपला दवाखान्यांचेही लोकार्पण केले जाणार आहे.
काञज घाटातील अपघात; ट्रक २०० फूट खोल दरीत – सविस्तर बातमी
‘आरोग्याचा ध्यास, महाराष्ट्राचा विकास’ या ध्येयाने राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग काम करीत असून, शासनाची राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य जनतेस आरोग्य विषयक सेवा सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने आरोग्य सेवेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत विकास प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र, पुणे या दहा मजली इमारतीचे भूमिपूजन होत आहे. या इमारतीमध्ये आरोग्य विभागाचे पुण्यातील सर्व राज्यस्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमध्ये प्रशिक्षण हॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल, रेकॉर्ड रूम, पार्किंग इत्यादी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना: राज्यातील शहरी भागातील गरजू नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २० आपला दवाखाना सुरु करण्यात येणार असून या दवाखान्यांचे लोकार्पण होत आहे.कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रतापराव जाधव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या उपस्थित राहणार आहेत.