पावणे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांच्या खात्यात वळवले, पोलिसांकडून चौकशी
marathinews24.com
पुणे – विदेशी तरूणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनु कुकडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. त्यातील पावणे दोन कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह त्यांच्या मुलाच्या खात्यात वर्ग झाले आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी मानकर यांची चौकशी केली आहे. आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपावरून चौकशी केली आहे. कुकडेचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता पुत्रांच्या खात्यात पावणे दोन कोटी रूपये आले आहेत.
आरोपी शंतनू कुकडे याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अशातच कुकडेच्या बँक खात्यात १०० कोटी रूपये पोलिसांना आढळून आले असून त्यातील ४० ते ५० कोटी रूपये विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. त्याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.कुकडेविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास समर्थ पोलिसांकडे आहे. तर प्रकरणाचे गांभिर्य पाहता गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. मागील आठवड्यात मानकर यांची चौकशी केली आहे. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात ८ आरोपी अटक केले होते ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांचे आयकरसह ईडीला पत्र
आरोपी शंतनू कुकडे याच्या खात्यात तब्बल १०० कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. चेन्नईतील कंपनी असून, त्या कंपनीचा कुकडे हा डायरेक्टर होता. त्या कंपनीच्या शेअरद्वारे हे पैसे खात्यात आल्याचे कुकडेने सांगितले आहे. त्याच्या खात्यातून चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हे पैसे १० ते १५ व्यक्तींच्या खात्यात गेले आहेत. प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांना पत्र लिहले आहेत. कुकडेच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडीट केले जाणार आहे.
सामूहीक बलात्काराचे कलम वाढ
कुकडेच्या बाबत दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात सामूहीक बलात्काराचे कलमवाढ करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही महिलांच्या खात्यात पैसे गेल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
रोनक जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले आहेत. आमचा एक जमीनीचा व्यवहार आहे. तो रोनकच्या सोबत झाला आहे. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झालेली आहे. शंतनु कुकडेचे वैयक्तीक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. हा आमच्या राजकिय बदनामीचा कट आहे. विनाकारण माझी बदनामी करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. – दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर (अजित पवार गट)
मनी ट्रेलच्या अनुषंगाने दिपक मानकर यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी चार एकर जमीनीच्या व्यवहारापोटी ही रक्कम दिल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. पुढील तपास सुरू आहे. – संदीपसिंह गिल्ल,पोलिस उपायुक्त