महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची पुण्यात बैठक
marathinews24.com
मुंबई – राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काजूची उत्पादकता वाढवण्याच्या संधी आहेत.आवश्यक त्या उपाय योजना केल्याने उत्पादकता वाढवता येईल. त्यासाठी काजू पिकाचे उत्पादन घेताना तसेच उत्पादन झाल्यानंतर त्यावर होणाऱ्या प्रक्रिया या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यात याव्या. राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, त्यासाठी जगातील काजू उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांतील अद्यावत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्याकडे राबवण्या संदर्भात उपाय योजना करून त्या माध्यमातून काजू पिकाची उत्पादकता वाढवावी असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या बैठकीत दिले.
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद – सविस्तर बातमी
महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची आज पुण्यात बैठक झाली त्यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक श्रीधर डुबे पाटील, महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने तसेच काजू मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, काजू उत्पादनाच्या वाढीसाठी जगातील चांगल्या काजू वाणाचा अभ्यास करून राज्यात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. काजू पिक आल्यानंतर त्यावर प्रक्रिया व साठवणूक करण्याच्या कामासाठी महिला बचत गटाची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग करून घ्यावा.काजूतील ओलावा कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना गोडवून उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्या माध्यमातून काजू प्रक्रिया करण्यात महिला बचत गटाचा व महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग वाढेल. त्यांनाही रोजगार निर्मिती होऊन, काजू प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत होईल.चंदगड आणि कुडाळ मध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संदर्भात व्यवहार्यता तपासण्यात यावी. तसेच 500 मेट्रिक टन क्षमतेचे गोडावून उभारण्या बाबत नियोजन करावे.
तसेच काजू उत्पादन, त्यावरील प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि मूल्यवर्धन करण्यासाठी जगातील अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा.काजू उद्योगांना अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करावा. काजू उद्योगांना अद्यावत करण्यासाठी व्हिएतनाम, कंबोडिया या सारख्या देशातील तसेच जगातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते महाराष्ट्रात कसे राबवले जातील यासाठी काजू मंडळाने नियोजन करावे.100 टन प्रति दिन उत्पादन क्षमतेचे प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील या संदर्भात उपाय योजना कराव्यात. काजू लागवडी पासून ते त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन पूर्वक काम केले तर काजू उत्पादन व उत्पन्न वाढू शकते असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले बरोबर काजू मंडळाच्या विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.