१५ दिवसांपूर्वी केली होती बेकायदा घुसखोरी
marathinews24.com
पुणे – शहरातील कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या घुसखोरांमध्ये एका महिलेचा समावेश असून, १५ दिवसांपूर्वी त्यांनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. हलाल अश्रफ खान (वय ३३), सोहेल खोका शेख (वय ३२) आणि लामिया अल्ताफ हवालदार (वय ३२, तिघे मूळ रा. बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कलमांन्वये आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खून; उत्तमनगर पोलिसांकडून पतीला अटक – सविस्तर बातमी
बांग्लादेशी नागरिक आरोपी खान, शेख, हवालदार यांनी १५ दिवसांपूर्वी पुण्यात बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे उघडकीस आले. आंबेगावातील शनिनगर भागातील एका घरात ते राहत होते. याबाबतची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पथकाने कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून मोबाइल आणि बांगलादेशी नागरिकत्वाचे ओळखपत्र जप्त केले आहे. आरोपींनी त्यांच्या मोबाइलवरून बांगलादेशात संपर्क साधल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी भारतात वास्तव्य करण्यासाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार केले आहे का? तसेच त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का? यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अमर ननावरे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.