वारजे भागातील घटना; गोळीबारामागचे कारण अस्पष्ट
marathinews24.com
पुणे – शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) पदाधिकारी निलेश घारे यांच्या मोटारीवर सोमवारी रात्री हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना वारजे भागात घडली आहे. सुदैवाने मोटारीत कोणी नसल्याने गंभीर घटना टळली आहे. गोळीबार झाला तेव्हा घारे हे त्यांच्या कार्यालयात होते. हल्लेखोराने मोटारीच्या काचेवर गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे.
कुख्यात शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव उधळला – सविस्तर बातमी
निलेश राजेंद्र घारे (वय ३७, रा. स्वरा हाईट्स, न्यू अहिरेगाव, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारे यांच्या मोटारीवर गोळीबार केल्याप्रकरणी एकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारे हे शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी असून, त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकाशी वाद झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जिवाला धोका असल्याच्या तक्रार अर्ज पुणे ग्रामीण आणि वारजे पोलिस ठाण्यात दाखल केला होता. घारे यांचे वारजे भागातील गणपती माथा परिसरात कार्यालय आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ते कार्यालयात थांबले होते. त्यावेळी त्यांनी मोटार कार्यालयासमोर उभी केली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी मोटारीच्या पाठीमागील बाजूच्या काचेवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घारे कार्यालयातून पळत बाहेर आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती वारजे पोलिसांना दिली.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कदम, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पुंगळी जप्त केली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी गणपती माथा परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस निरीक्षक काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.