विमाननगरमधील घटना
marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्याला लुटल्याची घटना १७ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी त्याच्याकडील चार हजारांची रोकड, मोबाइल असा १९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना विमाननगरमधील स्काय बेलवेदर्स सोसायटीजवळ घडली असून, मांजरी हडपसर परिसरात राहणार्या तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार अज्ञात तिघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी हडपसर परिसरात राहायला असून, १७ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास विमाननगरमधील स्काय बेलवेदर्स सोसायटीजवळून पायी जात होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्याला अडविले. धमकावून त्याच्याकडील ४ हजारांची रूपयांची रोकड, १५ हजारांचा मोबाइल असा १९ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार दुचाकीस्वार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अमलदार यु. आर. धेंडे तपास करीत आहेत.
लुटमारीच्या घटना वाढल्या, दुचाकीस्वार चोरट्यांना धाकच नाही
शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला असून, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेतला नसल्याचेही दिसून आले आहे. बाणेर परिसरात कोरियन अभियंत्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच, दुचाकीस्वार चोरट्यांकडूनही तरूणांसह महिलांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे महिलांसह पादचारी तरूण, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा माग काढून अटकाव करण्याची मागणी केली आहे.