सीपीआर दिल्याने डेमूतील युवतीचे वाचले प्राण!
Marathinews24.com
पुणे – रेल्वेतून प्रवास करणार्या दोन परिचारिकांमुळे २८ वर्षीय तरूणीला जीवदान मिळाले आहे. दोन्ही परिचारिकांनी दाखविलेल्या तत्परतेने तरुणीला वेळेत सीपआर देण्यात आला. त्यामुळे तिला श्वास घेताना येत असलेली अडचण दूर झाली. परिचारिका प्राजक्ता असुर्लेकर आणि ज्योती सुल अशी देवदूत परिचारिकांची नावे आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्वाचे निर्णय – सविस्तर बातमी
दौंडहून पुणे स्थानकाकडे येणार्या डेमू रेल्वेत जहांगिर हॉस्पिटलच्या दोन परिचारिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे २८ वर्षीय तरूणीचा जीव वाचला आहे. परिचारिका प्राजक्ता असुर्लेकर आणि ज्योती सुल यांनी प्रसंगावधान दाखवित तरूणीला सीपीआर दिला. दोन्ही परिचारिका दौंड-पुणे डेमूमध्ये प्रवास करत असताना सकाळी सव्वा आठ वाजता यवत आणि उरळी स्टेशनदरम्यान तरुणीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे काही वेळातच तरूणी बेशुद्ध झाली. ही बाब प्राजक्ता असुर्लेकर आणि ज्योती सुल यांच्या लक्षात येताच त्यांनी वेळ न दवडता तिला सीपीआर देण्यास सुरुवात केली. रेल्वे उरळी स्टेशनवर पोहोचताच, परिचारिकांनी इतर प्रवाशांच्या मदतीने तरुणीला प्लॅटफॉर्मवर उतरवले . तिचा सीपीआर सुरूच ठेवला असल्यामुळे तिला श्वास घेण्यास मदत मिळाली.
प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती दिल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका चालकाला संपर्क साधण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसरात रुग्णवाहिका येईपर्यंत दोन्ही परिचारिकांनी तरुणीस सीपीआर देण्याचे काम सुरूच ठेवले होते. रुग्णवाहिका आल्यानंतर प्राजक्ता व ज्योती यांनी संबंधित आरोग्य कर्मचार्यांना घटनेची माहिती दिली. तरुणीस तत्काळ उरळीतील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राजक्ता असुर्लेकर यांनी तरूणीच्या भावाला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. दरम्यान, प्राजक्ता आणि ज्योती यांनी दाखवलेले धाडस, माणुसकी, तत्परतेने तरूणीचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. त्यांनी रेल्वेतील इतर प्रवाशांनाही आपत्कालीन प्रसंगात काय करावे याचे मार्गदर्शन केले.