आसाममधील महिलेसह मुलीची मुस्लिम मुलाने ५ लाखात केली विक्री, प्रेमसंबंध, लग्नाच्या आमिषाने फसवणूक; चार महिने सोसल्या मरणयातना, अखेर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुस्लिम मुलाने तिला पुण्यात संसार थाटण्यासाठी आणले. त्यानंतर पैशाच्या मोहात महिलेसह तिच्या मुलीची ५ लाखात कुंटनखाण्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरमेची बाब म्हणजे पुणे पोलिसांच्या फरासखाना तपास पथकात (डीबी) कार्यरत असलेल्या एकाने संबंधित महिलेसोबत वारंवार अनैसर्गिक बलात्कार केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बुधवार पेठेतून कशीतरी सुटका करून घेत महिलेने हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत न्याय मागितला. अखेर याप्रकरणी आरोपींविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्व वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर केले कोयत्याने सपासप वार – सविस्तर बातमी
शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम, पापा शेख, अधुरा शिवा कामली आणि डीबीवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आसाममधील २५ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची आसाममधील असून, ती मूळगावी असताना २०१८ साली तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी नांदत असताना तिच्या पतीला व्यसनाचा नाद लागला. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद सुरु झाले होते. दरम्यानच्या काळात महिलेने मुलीला जन्म दिला. महिलेच्या पतीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने बाळंतपणानंतर काही वर्षांनी मुलगी मोठी झाल्यावर महिलेने व्यवसाय सांभाळण्यास सुरूवात केली. त्यावेळी पतीचा मित्र आलम हा दुकानावर रोज येत असल्याने त्यांच्यात ओळख वाढली. त्यानंतर त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवले.
नवऱ्याला दारूचे व्यसन असल्याने आणि सततच्या भांडणाला कंटाळून तिने आरोपी आलमसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. तू माझ्यासोबत पुण्याला चल, तिथे आपण लग्न करून संसात थाटू असे आमीष त्याने महिलेला दाखवले. तुला नोकरीला लावून, मुलीचाही सांभाळ करतो, या बतावणीला बळी पडल्याने महिलेने आलम सोबत पळून जाण्याचे ठरवले. त्यानुसार २८ डिसेंबर २०२४ मध्ये तिने घर सोडले. आरोपी आलम आणि महिलेसह मुलगी १ जानेवारीला विमानाचा प्रवास करीत तिघेही पुण्यात विमानतळावर उतरले. त्याठिकाणी रिक्षा करून आरोपी आलमने थेट बुधवार पेठ गाठली. तिथे त्याने दोघींनाही खोलीत बसवले. त्याने महिला आणि तिच्या मुलीला पापा शेख, अधुरा शिवा कामली यांच्याशी ५ लाखाचा व्यवहार करून पैसे घेत वेश्या व्यवसायासाठी विक्री केली. त्यानंतर तो पसार झाला होता.
महिलेने ४ महिने भोगल्या मरणयातना
जानेवारी ते एप्रिल कालावधीत आरोपी पापा शेख आणि अधुरा शिवा कामली यांनी मिळून महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. प्रत्येक ग्राहकाकडून २ हजार रुपये घेऊन त्यांना महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान काळात दोन दिवसांपूर्वी महिलेने बुधवार पेठेतून पळून जाऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी कुंटनखाना मालकीनीकडुन ५ लाख रुपये घेतल्याने गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप तिने केला. दरम्यान तिने हिंदुत्ववादी संघटनांचे दार ठोठावत त्यांना सगळी आपबीती सांगितली. त्यानुसार संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेवर अनैसर्गिक बलात्कार करणारा फरासखाना डीबीवाला कोण
कुंटणखाना मालकिणीसह आरोपी पापा शेख याने पीडित महिलेला फरासखाना पोलिसांची भीती दाखवली होती. त्यानुसार एका डीबीवाल्या पोलिसासोबत त्यांनी महिलेला अनैसर्गिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. संबंधित डीबीवाल्यानेही
पीडितेवर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे डीबी अर्थात तपास पथकातील कोणता कर्मचारी अथवा अधिकारी यामध्ये गुंतला आहे. त्याने पीडितेवर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार केले आहेत. त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान महिला सुरक्षिततेबाबत सातत्याने दक्षतेची भूमिका घेणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे