गोल्फ क्लबर रस्त्यावर झाला अपघात
Marathinews24.com
पुणे – भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार अल्पवयीनाचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीनाबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रिण जखमी झाली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अली मोहम्मद शेख (वय १४, रा. अल कुरेश हाॅटेलमागे, कामराजनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार अल्पवयीनाचे नाव आहे. अपघातात अली याच्याबरोबर सहप्रवासी मैत्रीण हजरा मुजफ्फर अन्सारी (वय १२) ही जखमी झाली. अलीचे वडील मोहम्मद गुलाब शेख (वय ४०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अली आणि त्याची मैत्रीण हजरा सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास येरवडा भागातील जलतरण तलावात पोहोण्यासाठी निघाले होते. गोल्फ क्लब चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अली आणि त्याच्याबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रीण हजरा खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी गोल्फ क्लब चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण तपास करत आहेत.
पालकांचा बेजबाबदार कधी थांबणार
अल्पवयीनांना मुलांना दुचाकीसह मोटार चालवायला ताब्यात देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही अनेक पालक मुलांना दुचाकी, मोटार चालविण्यास देतात. पालकांच्या बेजबाबदारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या दुर्घटना घडतात. यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.