रिक्षातून गुटख्याची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
marathinews24.com
पुणे – प्रतिंबंधित गुटख्याची तस्करी करण्यासाठी रिक्षाचा वापर करीत वाहतूक करण्याचा डाव कोथरूड पोलिसांनी उधळून लावला आहे. पानटपरी चालकांना गुटखा विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विमल, आरएमडी, राजनिवास ब्रँडचा ८१ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. त्यासोबतच रिक्षा आणि दोन मोबाइल असा एकूण अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विनित राधाकांत तिवारी ( वय २६ रा. उत्तर प्रदेश ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी आहे.
दागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले; पुण्यातील रविवार पेठेतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटख्याची विक्री, वाहतूक बंद असतानाही रिक्षातून एकजण गुटख्याची विक्री करणार असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बधाई चौकात सापळा रचून रिक्षा चालक विनीत तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षात विमल, आरएमडी, राजनिवास ब्रँडचा ८१ हजारांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी १ लाख ५० हजारांची रिक्षा, दोन मोबाइल, प्रतिबंधित गुटखा असा अडीच लाखांवर ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी पानटपरी चालकांना गुटखा विक्रीसाठी आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिस अमलदार दीपक साहेबराव चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.
गस्तीवेळी मिळाली माहिती अन सापडले तस्कर
कोथरूड पोलिसांकडून २७ एप्रिलला दुपारपासून रात्रीपर्यंत गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आलेकर यांना रिक्षातून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बधाई चौकाजवळ सापळा रचून रिक्षाचालकाला अडविण्यात आले. त्याच्याकडून गुटखा जप्त करीत कोथरूड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातींवर बंदी) कायदा २००३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.