लोणावळ्यात पर्यटक सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आग्रह
marathinews24.com
पुणे – लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. लोणावळामधील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे, नायब तहसीलदार अमोल पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरण सोनावणे, नगर पालिका प्रशासन अधिकारी संतोष खाडे, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे उपस्थित होते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन – सविस्तर बातमी
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणे, कार्ला लेणी, एकविरा देवीचे मंदीर आहेत, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परिसरात अपघात, श्वानदंश, सर्पदंश, मधमाशी व वटवाघूळाचे हल्ले, अंमली पदार्थ व दारुचा पुरवठा, आदी बाबी सामोरे येताना दिसत आहेत. त्यामुळे या बाबी विचारात घेता प्रथमोपचार, पोलीस मदत, स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसोबतच अवैध गुटखा व अंमली पदार्थ वाहतूक विक्री करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही प्राधान्याने कराव्यात.
एकविरा देवीच्या यात्रेवेळी मधमाशा निर्मूलन मोहीम राबवावी, मधमाशापासून बचाव करण्यासाठी संरक्षणात्मक मार्गदर्शिका तयार कराव्यात. जेणेकरून पर्यटकांना त्रास होणार नाही. करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची पर्यटकांना माहितीसाठी जनजागृती करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील, याबाबत दक्षता घ्यावी.
लोणावळा पोलिसांच्यावतीने पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुविधा
लोणावळा पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीच्यादृष्टीने शहरी भागासाठी ९८५०११२४०० आणि ग्रामीण भागासाठी ९१४६०३२९७१ असे हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. पर्यटकांनी या क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही, पर्यायाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी नेहमी दक्ष रहावे.
नगरपरिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे
लोणावळा नगर परिषदेने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. जलपुनर्भरण, सौर ऊर्जा निर्मिती, तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासोबत प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्यादृष्टीने डास निर्मूलन मोहीम आयोजित करावी. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय इमारती, विश्रामगृहातील कक्षांच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. महसूल विभागाने तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करुन नागरिकांच्या अधिकाधिक अडीअडचणी निकाली काढाव्यात, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.