लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे– ठेकेदाराकडून ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने पकडले आहे. शिरूरतालुक्यातील भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी निर्मला कैलास भुजबळ (वय ४४) यांना अटक केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
वाहन चोराकडुन दोन दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
ठेकेदाराने २०२०-२१ मध्ये शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात सिमेंटचे गट्टू (पेव्हर ब्लाॅक) बसविले होते. अंगणवाडीचे बांधकाम केले होते. या कामाचे देयक ठेकेदाराने ग्रामपंचायत अधिकारी निर्मला भुजबळ यांना दिले होते. देयक मंजुरीसाठी भुजबळ यांनी ठेकेदाराकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीची पडताळणी केली. भुजबळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात सापळा लावण्यात आला.
ठेकेदाराकडून ६० हजारांची लाच स्विकारताना भुजबळ यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.