बंडगार्डन आणि गुन्हे शाखेची कामगिरी
marathinews24.com
पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्थानकात झोपलेल्या एक वर्षीय मुलीचे अपहरण करणार्या त्रिकुटाला बंडगार्डन पोलिसांसह गुन्हे शाखेने अटक करीत चिमुरडीची सुखरूप सुटका केली आहे. संबंधित टोळीला दौंड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक तपासात मुलीची विक्री करण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी १६ तासांत मुलीची सुटका करीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सोसायटीच्या आवारात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पीडित मुलीचे कुटूंबिय ३० मे रोजी रात्री सव्वा नउच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील दत्त मंदिरासमोर मोकळया जागेत झोपले होते. त्यावेळी मुलीची आई झोपेत असताना टोळक्याने एक वर्षीय मुलीचे अपहरण केले. काही वेळानंतर महिलेला जाग आल्यानंतर तिला मुलगी न दिसल्यामुळे तिने शोधाशोध केली. त्यानंतर तत्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यता धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हे शाखा व बंडगार्डन पोलिसांनी तपास सुरु करुन स्टेशन परिसरासह आजूबाजूचे ६५ हुन अधिक कॅमेरे तपासले. त्यावेळी मुलीचे अपहरण करणारी महिला व पुरुष कॅमेरामध्ये चित्रीत झाल्याचे दिसून आले. संशयीत महिला व पुरुष अपहरण झालेल्या मुलीला प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरुन निघणार्या पनवेल -नांदेड- पनवेल या रेल्वेमधून घेउन जाताना दिसून आले.
पुणे स्टेशन पासून नांदेड कडे जाणार्या प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ, जीआरपी व स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आल्या होत्या. काही पथके कुर्डुवाडी, बार्शी, सोलापुर, लातुर, दौंड या भागात रवाना केली. विविध पथके अपहरण करणार्या संशयीतांचा शोध घेत होते. त्यावेळी अपहरण करणारे संशयीत दौंड रेल्वे स्थानक परिसरात मिळून आले. त्यांना ताब्यात घेउन मुलीची सुटका केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त गौहर हसन, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदिपान पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक भगवान ईप्पर, एपीआय अभिजीत चौघुले, उपनिरीक्षक वैभव मगदुम यांनी केली.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आईसमवेत झोपलेल्या एक वर्षीय मुलीचे अपहरण करणार्या तिघांना बंडगार्डन पोलिसांसह गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथकांसह इतर विभागाने टीमवर्क केले. अवघ्या १६ तासांत चिमुरडीची सुखरूप सुटका केली आहे. तिचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी झाले आहे, याचा तपास अपहरणकर्त्यांकडे सुरू आहे.
गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर






















