सायबर चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पेन्शन कार्ड तयार करुन देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १६ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाकल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कौटुंबिक वादातून महिलेच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. पेन्शन कार्ड तयार करुन देण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी त्यांना एक ॲप उघडण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सागून चोरट्यांनी ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी १६ लाख ४२ हजार २१५ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.
‘डिजिटल गोल्ड’ खरेदीच्या आमिषाने ८१ लाखांची फसवणूक
‘डिजिटल गोल्ड’ खरेदी विक्री व्यवहारात गुंतवणुकीच्या आमिषाने चंदननगर भागातील एकाची सायबर चोरट्यांनी ८१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादाराच्या मोबाइल क्रमांकाव सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला. शेअर बाजारात डिजिटल गोल्ड खरेदी विक्री व्यवहारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे अमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनालइन पद्धतीने पैसे गुंतविणयास सांगितले. तक्रारदाराने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे गुंतविले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. परतावा, तसेच मुद्दलही न दिल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन फसवणूक
गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे ओैंधमधील सानेवाडी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून ग्राहकांचे देयक अद्ययावत करण्यात येत असून, ग्राहकांची माहिती संकलित करण्यात येत आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी गॅस देयक अद्ययावत करण्याच्या नावाखाली ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्यातून पैसे काढून घेतले. पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.






















