पुणे ग्रोथ हब अंतर्गत ५ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांना प्राधान्य; कार्यकारी समितीची बैठक संपन्न
marathinews24.com
पुणे – पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी महत्त्वपूर्ण असून प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी पुढील ५ वर्षांत खर्च करण्यासाठी ५,००० कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून सुरु करावयाच्या प्रकल्पांचा प्राथम्यक्रम ठरवून प्रकल्प आराखडा तयार करावा,अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या.
उद्योग क्षेत्राला आर्थिक बळ देण्यासाठी बँकांचा संयुक्त पुढाकार – सविस्तर बातमी
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी,पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मॅकेन्झी कंपनीचे रौनक शहा तसेच पीआयसीचे संचालक दिनानाथ खोलकर उपस्थित होते.
श्रीमती तेली-उगले यांनी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमान, गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख बाबी लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा सादर करावा, प्रकल्पांची यादी तयार करताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा अशा सूचना दिल्या.
हर्डीकर म्हणाले, प्रत्येक प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च व कालक्रम ठरवावा, अनेक प्रकल्पांना भूसंपादन आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत महानगर प्रदेशांच्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करुन उद्योग, रोजगार व गुंतवणूक वाढीस चालना आदी बाबींचा विचार करुन बृहत आराखडा तयार करावा.
पुणे महानगर प्रदेश माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था यांमुळे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या उपक्रमांतर्गत महानगर क्षेत्राच्या विविध विकासासह सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे व रोजगाराकरिता मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे ध्येय असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत नीती आयोगाला सादर करावयाच्या मसुद्याचे मॅकेन्झी कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले.






















