लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – लोणीकंद परिसरातील माऊली बाल आश्रमाजवळ भरधाव चारचाकीच्या धडकेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी मुलीला कोणतीही मदत न करता चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परताव्याचे आमिष; १२ कोटी रुपयांना गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या दादाभाऊ गावडे (वय १४) ही तिच्या मैत्रिणीसोबत क्लासला गेली होती. क्लास संपल्यानंतर दोघी दुचाकीवरून घरी परतत असताना १० जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊली बाल आश्रमाजवळ समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनन्या गंभीर जखमी झाली. मात्र, अपघात घडविणाऱ्या चालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. जखमी अनन्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अनन्याचे वडील अनिल दादाभाऊ गावडे (वय ४०, रा. वाडेबोल्हाई, हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या चालकाचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.






















