शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पत्र
marathinews24.com
पुणे – फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर-काळेपडळ परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका घेतली होती. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या दारूमाफियांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला थेट इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यात अवैध दारूच्या जाळ्यावर मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक – सविस्तर बातमी
मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, तर अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या गंभीर घटनेनंतर शिवसेनेने केवळ निवेदने देण्यापुरती भूमिका न घेता थेट रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारले. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी “पुणे जिल्ह्यातील दारूमाफियांचे कंबरडे मोडा” असा थेट इशारा देत दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. समाजाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अवैध व्यवसायाला कायमचा आळा बसला पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली. पुणे शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेले अवैध गावठी दारू अड्डे आणि बनावट गावठी दारू विक्री केंद्रांविरोधात धडक मोहीम उभारण्यात आली. हडपसर येथे अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी प्रत्यक्ष कारवाई करत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
शिवसेना महिला आघाडीनेही आक्रमक भूमिका घेत बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडले. महिलांच्या संसाराची राख करणाऱ्या आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या या काळ्या व्यवसायाविरोधात महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर धडक मोहीम राबवली. अनेक भागांत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. समाजाच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी दिलेला हा लढा सर्वसामान्यांच्या भावनांना न्याय देणारा ठरला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठविलेल्या अधिकृत पत्रातील माहितीनुसार, संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून अवैध दारू निर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी विशेष पथके सातत्याने कार्यरत आहेत. विविध ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखो लिटर अवैध मद्य आणि कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “मिथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारूमुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 25 गुण अधिक नागरिकांचे बळी गेले आहे नंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत पुण्यातील अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले, महिला आघाडीने हल्लाबोल आंदोलन केले आणि प्रशासनाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडले. आज मिळालेल्या अधिकृत पत्रातून व्यापक कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दारूमाफियांचे संपूर्ण कंबरडे मोडल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. अवैध दारूच्या या काळ्या साम्राज्याविरोधातील शिवसेनेचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील.”
अवैध दारूविरोधातील ही लढाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून समाजाच्या सुरक्षिततेची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणाची लढाई आहे. पुणे जिल्ह्यातील दारूमाफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिवसेना पुढेही जनतेच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






















