१० लाखांच्या मुद्देमाल जप्त; दोन आरोपींना बेड्या
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २० किलो ३४० ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ९ लाख ७७ हजार ३२० रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्य – सविस्तर बातमी
शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय ५५, रा. धर्मापुरी, ता. परळी) व वसीम बाबुलाल अत्तार (रा. धर्मापुरी, ता. परळी) यांच्यावर कारवाई करण्यात आली. धर्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक शिवाजी बट्टेवार यांना खबऱ्यमार्फत मिळाली होती. त्यानुसार गुरुवार (दि.११) सायंकाळी धाड टाकण्यात आली. या कारवाईदरम्यान पांढऱ्या पोत्यात ठेवलेला उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर तो २० किलो ३४० ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थाची विक्री केल्याचा आरोप आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके , सहायक पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धनराज जारवाल, हवालदार दिलीप गित्ते, भागवत शेलार, दिपक खांडेकर, स्वाती मुंडे, हराळे, परळी ग्रामीणचे एपीआय मेंडके, वाले, नवनाथ हरगांवकर यांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद हे करीत आहेत.























