नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नधिकृत टपऱ्या हटवल्या
marathinews24.com
पुणे – वानवडी पोलिस ठाणे आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (दि. १२) संविधान चौक, केदारी सर्कल, बालाजी डेअरी तसेच काकडे मैदान परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत अनधिकृत टपऱ्या व पत्र्याचे शेड हटवले. या भागात काही व्यावसायिकांनी फुटपाथलगत अनधिकृत टपऱ्या, शेड उभारल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या मुक्त संचारात अडथळे निर्माण होत होते. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली.
वानवडी पोलिसांसह महापालिकेची वाहतूक शाखा, महावितरण तसेच अग्निशमन दल यांच्या संयुक्त सहभागातून शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. कारवाईदरम्यान परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि पत्र्याचे शेड निष्कासित करण्यात आले. मोहिमेत महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाचे मिळून सुमारे १०० ते १२० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास डोबेवार, वाहतूक शाखेचे अधिकारी, महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातील अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.























