डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तोतया डाॅक्टरविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भवानी पेठेतील कासेवाडीत तोतया डाॅक्टर दवाखाना चालवित होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली.
दुचाकीची डिकी उचकटून २ लाखांची रोकड चोरी – सविस्तर बातमी
प्रमोद राजाराम गुंडू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी डाॅ. वसुंधरा पाटील यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. पाटील महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. तोतया डाॅक्टरांविरुद्ध कारवाईसाठी महापालिकेने शोध समिती समिती स्थापन केली आहे. गुंडू भवानी पेठेतील कासेवाडी भागात छोटा दवाखाना चालवित आहे. त्याच्याकडे वैद्यकीय पदवी नाही, तसेच वैद्यकीय परिषदेची नोंदणी नाही, अशी तक्रार डाॅ. पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कासेवाडीत जाऊन पाहणी केली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैदकीय परिषदेचे नोंदणी प्रंमाणपत्राबाबत विचारणा केली. तेव्हा त्याच्याकडे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. गुंड याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना तो रुग्णांवर उपचार करत असल्याचे डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स ॲक्टनुसार गुंडू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडू याचा दवाखाना बंद असून, याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे यांनी दिली.