सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक
marathinews24.com
पुणे – बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तोतया डाॅक्टरविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा – सविस्तर बातमी
तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. बँकेतून बोलत असून, बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची एक लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यानंतर त्याला परतावा दिला. परतावा मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. चोरट्याने त्याला रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.
गुंतवणुकीच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची सात लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे महंमदवाडीत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला परतावा दिला. परतावा दिल्यानंतर आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली