तरुणाला ४३ लाखांचा ऑनलाइन गंडा
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले असून, नानाप्रकारे भीती दाखवून ऑनलाइन गंडा घातला जात आहे. मागील काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायबर चोरटे नवनवीन क्लुप्त्या वापरून अनेकांची बँक खाते रिकामे करत आहेत. याकडे सायबर पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, अशा फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोकांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग मृत्यूचा सापळा – सविस्तर बातमी
दिल्लीतून सीबीआय अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरुणाला स्कायीपवर फोन केला. त्यानंतर तक्रारदार तरुणाचे आधारकार्ड क्रमांक विचारून घेतला. संबंधित आधार कार्डवर अनेक खटले दाखल आहेत, कागदपत्रे तपासणी करावी लागतील अशी बतावणी सायबर चोरट्याने तरुणाला केली. त्यानुसार त्यांच्या बँकेची गोपनीय माहिती जाणून घेतली. ऑनलाइनरित्या ४३ लाखांवर रक्कम ऑनलाइन वळवून घेत फसवणूक केली. याप्रकरणी वें कटरमणा ( वय २३, रा. रामनगर, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वेंकटरमणा बाणेरमध्ये राहायला असून, २ सप्टेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्याने त्यांना स्कायीप अँपद्वारे फोन केला. दिल्लीतून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत, त्यांनी तक्रारदार यांच्या आधारकार्डची माहिती घेतली. संबंधित आधारकार्ड हे दुसरे कोणीतरी वापरत असून, तुमच्या नावावर ५० खटले दाखल आहेत, अशी बतावणी केली. आम्हाला तुमचे बॅंक खाते तपासावे लागेल, त्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल, असे सांगत सायबर चोरट्यांनी तक्रारदार वेंकटरमणा यांच्या बँक खात्याचा अँक्सेस घेतला. २ ते ९ सप्टेंबर २०२४ या सात दिवसांत सायबर चोरट्यांनी तब्बल ४३ लाखांवर रक्कम स्वतः च्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.