कोंडीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
marathinews24.com
पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील अधिकृत वाहनतळ वगळता २०० मीटरच्या परिसरासत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मोटारी, रिक्षांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यांना जास्त काळ थांबता येणार नाही.
दिल्लीतुन सीबीआय अधिकारी बोलत असल्याची केली बतावणी अन घातला गंडा – सविस्तर बातमी
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर (इन आणि आउट गेट) बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होत होती. प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने लावण्यात आल्याने कोंडी होत असल्याच्या दिसून आले होते. रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून २०० मीटर अंतरावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिक, तसेच प्रवाशांनी लेखी सूचना, हरकती वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयात १७ मेपर्यंत पाठवाव्यात. सर्व सूचना विचारात घेऊन अंतिम आदेश काढला जाणार आहे. दरम्यान, या आदेशाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून तेथे फलकही बसविण्यात येणार आहे.
प्रवाशांची ने-आण करण्याची मुभा
रेल्वे स्थानकाच्या आवरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून २०० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना (कॅब, रिक्षा) थांबण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवेशद्वाराच्या परिसरात जास्त वेळ थांबता येणार नाही.