गुजरवाडीतील कचरा डेपोत आग
marathinews24.com
पुणे – कात्रज परिसरातील गुजरवाडी भागात असलेल्या कचरा डेपोला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कचऱ्याने पेट घेतल्यानंतर आग पसरली. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
कात्रज : टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, एक जखमी – सविस्तर बातमी
गुजरवाडीतील मोकळ्या जागेत तोडलेले झाडे तसेच पालापाचोळा टाकून दिला जातो. रविवारी दुपारी पालापाचोळ्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. सुका कचरा असल्याने आग भडकली. आग इतरत्र पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. तेथे असलेले पोकलेन यंत्रण, अन्य साहित्य बाहेर काढले. पालपाचोळ, तसेच सुका कचरा पेटल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अडचण आली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
पालपाचोळा पुन्हा पेटण्याची शक्यता होती, तसेच आग धुमसत होती. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. केंद्रप्रमुख गणेश भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
महंमदवाडीत सदनिकेत आग
हडपसर भागातील महंमदवाडीतील एका सोसायटीत सहाव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. आग पसरल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. त्या वेळी सदनिकेत सहाजण होते. आग लागल्याची माहिती मिळताच ते सदनिकेतू बाहेर पळाल्याने बचावले. या घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.