“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर – सविस्तर बातमी
marathinews24.com
पुणे – सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे व्हीके ग्रुपच्या वर्धापनदिनानिमित्त दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला कर्मचारी, स्वयंसेवक तसेच विविध संस्थांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्हीके ग्रुपच्या कार्यालयात आयोजित शिबिरात १०२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली.
“पाच फुटाचा बच्चन” मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर – सविस्तर बातमी
यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, सामाजिक कार्यकर्ते शिवराज सुतार, विश्वास कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, डॉ. पूर्वा केसकर, विजय साने आणि उपेंद्र देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाचा समन्वय अमोल उंबरजे, मेघना पिंगळे, प्रियांका बुरंगे, सुमित कापसे, हर्षित गेहलोट, वैशाली आठवले, एचआर स्मिता आणि विदुला फडके यांनी केला. या शिबिरामध्ये व्हीके ग्रुप, श्रुडकॉम, मुथा असोसिएट्स तसेच इतर विविध संस्थांतील कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यावेळी दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीच्या डॉ. अभिप्सा श्रोत्रीया, प्रिया चव्हाण आणि प्रतीक कल्याणकर उपस्थित होते.
समाजात स्वेच्छा रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करणे, नियमित रक्तदानाची सवय रुजविणे आणि ‘रक्तदान हीच सर्वोच्च मानवसेवा’ हा संदेश जनमानसात रुजविण्याचे उल्लेखनीय कार्य सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज करीत असल्याचे सांगत पुनीत जोशी आणि शिवराज सुतार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
रक्तदान हे केवळ दान नसून, एखाद्या अनोळखी व्यक्तीला नवजीवन देण्याची संधी आहे. अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया तसेच कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची सातत्याने आवश्यकता भासत असते. त्यामुळे समाजात स्वेच्छा रक्तदानाची चळवळ अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते, असे संस्थेच्या विश्वस्त अपूर्वा कुलकर्णी यांनी सांगितले.
सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज आणि व्हीके ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमांमधून आजपर्यंत ३८५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक रुग्णांना जीवनदान देण्याच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. समाजात रक्तदानाची संस्कृती अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदानाचा संकल्प करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
भविष्यातही आरोग्य, पर्यावरण आणि समाजकल्याणाशी निगडित अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजचे अमोल उंबरजे यांनी दिली.





















