वाघोलीतील व्यंकटेश हॉस्पिटलसमोर भरदिवसा जेष्ठ नागरिकाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत चौघाजणांनी जेष्ठ नागरिकाला अडवले. त्यांच्याकडील सोन्याचे एक लाखांचे दागिने हातचलाखीने काढून घेत लुट केली आहे. ही घटना ३० जुलैला सकाळी सव्वा आठच्या सुमारास वाघोली परिसरातील व्यंकटेश हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी आव्हाळवाडीत राहणार्या ७२ वर्षीय जेष्ठाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांंचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, आव्हाळवाडी परिसरात राहायला आहेत. ३० जुलैला सकाळी सव्वा आठच्या सुमारास ते रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी व्यंकटेश हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर चौघाजणांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असून, या परिसरात चाकूचा धाक दाखवून सोन्याची चोरी झाली आहे, अशी बतावणी केली. तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून बॅगेत ठेवा असे सांगितले. त्यानुसार जेष्ठाने त्यांच्याकडील १ लाखांची सोन्याची चैन काढून पिशवीत ठेवली. चोरट्यांनी पिशवी ताब्यात घेउन हातचलाखी करीत दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैजीनाथ केदार तपास करीत आहेत.
टोळी झाली अॅक्टीव्ह, जेष्ठ नागरिक रडारवर
महिलांना मोफत साडीचे आमिष दाखवून लुटमारीच्या घटना ताज्या असतानाच, पोलीस असल्याच्या बतावणीने चोरट्यांनी जेष्ठाला लुटले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी शांत असलेली टोळी पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाली आहे. संबंधित टोळीकडून जेष्ठ नागरिकांसह महिलांना टारगेट करून लुट केली जाते. टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
























