तीन अल्पवयीन मुलांचा समावेश, एकाला अटक
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावर भरदुपारी अल्पवयीन मुलाच्या खूनातील आरोपींना पुणे पोलिसांनी तब्बल १२ कोयत्यांसह पकडले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून एकाला अटक केली आहे. ही टोळी पर्वती परिसरात धारदार शस्त्रांसह दहशत माजविण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली. कोयते आरोपींनीच बनविले असल्याचेही समोर आले आहे. गौरव राजू कांबळे (वय १८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांसह धारदारांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर – सविस्तर बातमी
गौरव कांबळे तसेच यातील एक अल्पवयीन मुलावर यापुर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे. खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाजीराव रस्त्यावर भरदुपारी एका मुलाचा दुचाकीवरून येऊन कोयत्याने वारकरून खून झाला होता. त्याचे बोट देखील तोडले होते. या खूनाने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मुलांमधील वादविवादातून हा प्रकार घडला होता. खूनातून हे मुले जामीनावर बाहेर आले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की, पर्वतीतील जनता वसाहत परिसरात काही मुले शस्त्रे घेऊन थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान गौरव कांबळे याला अटक करण्यात आली, तर त्याच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. आरोपींकडून १२ कोयते जप्त केले.
गौरव कांबळे तसेच यातील अल्पवयीन मुलांचीच जनता वसाहतीत गँग तयार केली आहे. गौरव हा यापुर्वी वेल्डींगच्या दुकानात नोकरी करत होता. तेथील कामातून त्याने हे १२ कोयते स्वत: तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोयत्यांचा वापर दहशत माजविण्यासाठी करणार असल्याचेही समोर आले आहे.
























